
जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी इन्फ्लुन्सर्सशी साधला संवाद
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामे, लोककल्याणकारी योजना आणि सकारात्मक बदलांची माहिती अधिक प्रभावीपणे आणि व्यापक स्तरावर जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्ससोबत एका विशेष संवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शासन आणि सोशल मीडिया निर्माते यांच्यात समन्वय वाढवून गडचिरोलीची प्रगत आणि विकासाभिमुख ओळख राज्य व देशपातळीवर पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी उपस्थित इन्फ्लुन्सर्सशी संवाद साधताना सांगितले की, जिल्ह्याच्या विकासात्मक वाटचालीत सोशल मीडिया हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. शासनाच्या जनहिताच्या योजना, पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील यशोगाथा नागरिकांपर्यंत वस्तुनिष्ठ, विश्वासार्ह व जबाबदारीने पोहोचवणे आवश्यक आहे. तसेच, कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी त्याची तथ्य पडताळणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत ‘अनटॅप्प्ड गडचिरोली’ या विशेष संकल्पनेवर चर्चा करण्यात आली. याअंतर्गत जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वारसा, समृद्ध जैवविविधता आणि स्थानिक संस्कृतीचा डिजिटल माध्यमातून प्रचार-प्रसार करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे ठरले.
स्थानिक स्तरावरील दर्जेदार आणि सकारात्मक डिजिटल आशय निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे. विविध शासकीय जनजागृती मोहिमा आणि जाहिरातींच्या माध्यमातून सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्सना आर्थिक व इतर अनुषंगिक सहकार्य करण्याच्या शक्यतांवरही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
या यशस्वी चर्चासत्रात प्राची सातपुते, राहुल रोहनकर, पंकज नंदगिरीवार, विवेक मेटे, मोहित मसराम, हितेश वाघाडे, मंगेश मेश्राम, स्वेतेश मडावी, शुभम पारवेकर, अभिषेक गंडाटे, साक्षी उईके, प्रणय भजभुजे, सौरभ भांडेकर, आचल मडावी, निर्जल उराडे, अनेक सडमेक यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य डिजिटल क्रिएटर्स उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी जिल्ह्याच्या विकासात सक्रिय योगदान देण्याची तयारी दर्शविली.



