
जिल्हा प्रशासन आणि कॅनरा बँकेमध्ये सामंजस्य करार ; उमेद महिला बचत गटांनाही रोजगाराची संधी
गडचिरोली : जिल्ह्यातील क्षयरुग्णांना (टीबी रुग्ण) दर्जेदार पोषण सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कॅनरा बँक यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत कॅनरा बँक ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंदणीकृत झाली असून, बँकेकडून क्षयरुग्णांच्या पोषणासाठी ७२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. १४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि कॅनरा बँकेच्या विभागीय मुख्य शाखेचे सहायक प्रबंधक मृत्युंजय कुमार झा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार करण्यात आला.
यापूर्वी जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधीच्या माध्यमातून केवळ खाण प्रभावित क्षेत्रांतील क्षयरुग्णांना प्रायोगिक तत्त्वावर पोषण सहाय्य दिले जात होते. या उपक्रमाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता कॅनरा बँकेच्या सहकार्याने जिल्ह्याच्या उत्तर भागातील, जे क्षेत्र डीएमएफच्या कक्षेबाहेर आहे, तेथील रुग्णांनाही पोषणयुक्त अन्नकिट्सचा लाभ दिला जाणार आहे. औषधोपचारासोबत योग्य पोषण मिळाल्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरे होण्यास मदत होणार आहे.
या मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पोषण किट्सचे वितरण ‘उमेद’ अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या स्थानिक महिला बचत गटांमार्फत केले जाईल. किट्सची खरेदी, पॅकिंग आणि वितरण या सर्व प्रक्रियेत महिलांचा सहभाग असणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळण्यासोबतच महिला बचत गटांसाठी उत्पन्नाचे नवीन साधन निर्माण होणार आहे.
केंद्र शासनाच्या ‘टीबीमुक्त भारत’ संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, कॅनरा बँक आणि उमेद महिला बचत गट यांच्या उत्तम समन्वयातून राबविला जात आहे. गडचिरोली जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या दृष्टीने हे एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.



