भंडाराविदर्भ

कृषी विज्ञान केंद्रात ‘आयसीएआर डे’ निमित्त हवामान बदल व शेती व्यवस्थापनावर मार्गदर्शन

भंडारा : बदलत्या हवामानाचे आव्हान आणि शेती क्षेत्रातील वाढती जोखीम लक्षात घेता, शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र (KVK), साकोली येथे ‘आयसीएआर डे’ (ICAR DAY) च्या निमित्ताने एक दिवसीय विशेष कृषी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विज्ञान केंद्र (साकोली), डॉ. उषा कृषी विज्ञान केंद्र आणि वाॅटर संस्था (WOTR) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, कमी पाण्याचा वापर आणि पूरक पिकांची कास धरण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात करताना कृषी तज्ज्ञ महल्ले यांनी पारंपरिक भात लावणी पद्धतीमधील त्रुटींवर प्रकाश टाकला. पारंपरिक पद्धतीने भात लावणी करण्यासाठी भरपूर पाणी आणि मजुरांची आवश्यकता भासते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. याला उत्तम पर्याय म्हणून त्यांनी ‘थेट भात पेरणी पद्धत’ (DSR) वापरण्याचे आवाहन केले, ज्यामुळे पाणी आणि मजूर दोन्हीची मोठी बचत होते.

कृषी हवामान शास्त्रज्ञ के. एस. अनित्य यांनी सध्याच्या जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ‘अल निनो’ या घटकावर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानात पिकांचे नियोजन कसे करावे आणि दुष्काळी परिस्थितीला कसे तोंड द्यावे, याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या.

उद्यानविद्या तज्ज्ञ के. डी. तायडे यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीला फाटा देण्याचा सल्ला दिला. केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शाश्वत उत्पन्नासाठी फळबाग लागवडीकडे वळावे. फळबाग लागवड ही शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. असे त्यांनी सांगितले.

कीटकशास्त्रज्ञ डॉ. पी. एस. उंबरकर यांनी बदलत्या हवामानामुळे पिकांवर येणाऱ्या नवीन किडींच्या प्रादुर्भावावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे किडींची रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे, जी चिंतेची बाब आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा योग्य वापर केल्यास कमी खर्चात दर्जेदार आणि जास्त उत्पादन घेता येणे शक्य आहे.

मार्गदर्शन सत्रानंतर प्रक्षेत्र व्यवस्थापक (फार्म मॅनेजर) जी. एस. भगत यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्राची (फार्म) सफर घडवून आणली. तेथे सुरू असलेल्या विविध प्रयोगांची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण संचालन ए. डी. पायधन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार आर. पी. पवार यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button