गोंदियाविदर्भ

शाळेत जाणाऱ्या ७ वर्षांच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; महिलेच्या धाडसाने वाचले प्राण

गोंदिया : शहरातील प्रभाग क्रमांक ४, रिंग रोडवरील मजारच्या मागे एका ७ वर्षांच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांच्या कळपाने अचानक हल्ला केल्याची थरारक व धक्कादायक घटना समोर आली आहे. नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर उभ्या असलेल्या या निष्पाप मुलीवर गल्लीतील हिंस्त्र कुत्र्यांनी झडप घातली. मात्र, शेजारी राहणाऱ्या एका धाडसी महिलेने देवदूतासारखे धावून येत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुत्र्यांना पळवून लावल्याने चिमुरडीचे प्राण थोडक्यात वाचले.

ही चिमुरडी सकाळी शाळेचा गणवेश घालून नेहमीप्रमाणे घराबाहेर उभी होती. तितक्यात गल्लीतील अनेक भटक्या कुत्र्यांनी तिला वेढा घातला आणि तिच्यावर थेट हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या मुलीने जोरजोरात ओरडण्यास व रडण्यास सुरुवात केली. तिचा आक्रोश ऐकून शेजारी राहणारी एक महिला तातडीने बाहेर आली. तिने प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा केला आणि हातातील दगडांच्या साहाय्याने त्या हिंस्त्र कुत्र्यांना पळवून लावले. या हल्ल्याच्या प्रचंड भीतीमुळे चिमुरडीची प्रकृती खालावली असून, तिला तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या भयानक घटनेनंतर संपूर्ण गोंदिया शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये भटक्या कुत्र्यांचे कळप मोकाट फिरत असून पादचारी, दुचाकीस्वार, वृद्ध आणि लहान मुलांचे जगणे कठीण झाले आहे. या समस्येची नगर परिषद प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घ्यावी आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी आक्रमक मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button