
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील गांधीनगर येथे सध्या तीन दारू विक्रेते सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यावरून आष्टी पोलिस व मुक्तिपथने संयुक्त कारवाई केली आहे. येथील एका किराणा दुकानावर छापा टाकून ३,४९० रुपयांची अवैध देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली असून, एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गांधीनगर येथे मुक्तिपथतर्फे सघन भेटीदरम्यान गावात चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती गाव संघटनेने दिली. याबाबतची माहिती आष्टी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिस व मुक्तिपथ टीमने गावातील दोन विक्रेत्यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. अशातच अजित निमाई मंडल (वय ५२) हा आपल्या किराणा दुकानात अवैध दारू लपवून विकत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस व मुक्तिपथ टीमने सदर दुकानावर धाड टाकली. या कारवाईत आलमारीतून रॉयल स्टॅग विदेशी दारूच्या ७ निपा, रॉकेट देशी दारू संत्राच्या १३ निपा असा एकूण ३,४९० रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करून अजित निमाई मंडल याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हरिचंद्र झाडे, पोलिस कर्मचारी अभिनव दोडके, भोजराज मेश्राम, हेमके, मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी केली. दरम्यान, गावात सक्रिय असलेल्या उर्वरित दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.



