
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील आप्पापल्ली गावात वाढत्या अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी गावातील महिलांनी एकजुटीचा निर्धार केला आहे. गावात मुक्तिपथ अभियान व गाव संघटनेच्या माध्यमातून दारूविक्रीबंदीसाठी जोमाने प्रयत्न सुरू झाले असून, दोन दिवसीय सघन भेट उपक्रमांतर्गत गावातील महिलांची एक शक्तिशाली व सक्रिय संघटना गठित करण्यात आली आहे.
गावात अवैध दारूविक्री सुरू असल्याने अवघ्या २० ते २५ वर्षांची तरुण मुले व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे गावातील कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले असून महिलांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान मुक्तिपथच्या टीमने गावात २ दिवस ठाण मांडून सघन भेट उपक्रम राबविले. यातून विविध प्रमुख लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, पुरुषांची बैठक घेऊन दारूचे दुष्परिणाम पटवून दिले. शक्तीपथ महिलांच्या बैठकीत मार्गदर्शन मिळाल्यानंतर अनेक महिलांनी पुढे येत नव्या लढ्याची तयारी दर्शविली. त्यानुसार मुक्तिपथच्या नंदिनी आशा यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या शक्तिपथ महिला संघटनेची स्थापना करण्यात आली.
यात नवनिर्वाचित महिला संघटनेच्या ललिता हजारे (अध्यक्ष), लक्ष्मी डूबले (उपाध्यक्ष), जयतुला माहुलकर (सचिव) तसेच सदस्य म्हणून सविता चितेकर, पद्मा नागापुरे, अश्विनी हजारे, दरिया नैताम, ज्योत्स्ना चंदे, प्रमिला ठाकुर, सुनिता तुमडे, पुष्पा ठाकुर, ममता येलमुले, अरूणा सातपुते, ज्योती गावंडे, शुभांगी हुलके, मंगला सामेर, कमला सामेर, गंगुबाई चाफले, ईमला डूबले यांची निवड करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अवैध दारू विक्री विरोधात लढा उभारण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने गावातील महिलांनी उपस्थिती दर्शवून महिला संघटनेला पाठिंबा दिला आहे. यावेळी मुक्तिपथ उपसंघटक नितेश सोनी, स्पार्क कार्यकर्ते तुळशीराम आईलवार उपस्थित होते.



