
गोंडवाना विद्यापीठाचे ‘एसटीआरसी’, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि सृष्टी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
कुरखेडा : ग्रामीण व आदिवासी भागातील स्थानिक कारागिरांना शासकीय योजनांशी जोडून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (STRC), भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त विकास आयुक्त (हस्तशिल्प) कार्यालय आणि गडचिरोलीच्या सृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुरखेडा तालुक्यातील येरंडी येथे दुसऱ्या ‘चौपाल’ कार्यक्रमाचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ८५ कारागिरांनी सहभाग नोंदवत ‘आर्टिसन कार्ड’साठी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.
या विशेष चौपाल कार्यक्रमाचे उद्घाटन कुरखेडाचे नायब तहसीलदार वैभव आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कारागिरांना राष्ट्रीय स्तरावरील ओळख मिळवून देणाऱ्या ‘आर्टिसन कार्ड’चे (Artisan Card) महत्त्व पटवून देणे, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणे आणि ‘प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजने’च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य कसे मिळवावे, याबाबत कारागिरांना सविस्तर मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले डी. सी. हँडीक्राफ्ट कार्यालयाचे अतिरिक्त संचालक अवधेश ठाकूर आणि हँडीक्राफ्ट प्रमोशन ऑफिसर दिलीप कुमार यांनी कारागिरांना आर्टिसन कार्डचे महत्त्व, त्याद्वारे मिळणाऱ्या शासकीय सुविधा आणि उत्पादनांना थेट बाजारपेठेशी जोडण्याच्या संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली. आयोजित संवाद सत्रात कारागिरांनी आपल्या अडचणी व शंका मांडल्या, ज्यांचे उपस्थित तज्ज्ञांनी समाधानकारक निरसन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे (STRC) मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख स्वप्निल गिरडे यांच्यासह सृष्टी फाउंडेशनचे संचालक केशव गुरनुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या चौपाल कार्यक्रमाला कुरखेडा, कोरची व वडसा परिसरातील शेकडो हस्तशिल्प कारागीर, विविध विभागांचे शासकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गम भागातील कारागिरांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा एसटीआरसीचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
“केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा स्थानिक कारागिरांनी जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. उपलब्ध संधींचा प्रभावीपणे उपयोग करून कारागिरांनी स्वावलंबी व्हावे, यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.”
— वैभव आंबेकर (नायब तहसीलदार, कुरखेडा)



