
बनावट आर.सी. बुकसह ६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लागला छडा
वरोरा : वरोरा शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात वरोरा पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत गोपनीय व धडक कारवाई करत आंतरजिल्हा बाईक चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून तीन सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून चोरीच्या एकूण १३ मोटारसायकली आणि बनावट आर.सी. बुक असा एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या धडक कारवाईची पाळेमुळे ४ जुलै २०२६ रोजी घडलेल्या एका चोरीच्या घटनेशी जोडलेली आहेत. वरोरा येथील वेण्णा नगर निवासी अमोल दयाराम भोयर यांची ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना पोलिसांनी वरोरा शहरासह नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज बारकाईने तपासले. यादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काही संशयितांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच, मोटारसायकल चोरीचे हे मोठे रॅकेट समोर आले.
पोलिसांनी या प्रकरणात हेमंत विनोद चौधरी (रा. शिंगणापूर गोटमाडी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा), सूरज एकनाथ उमरे (रा. देहेगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर), प्रमोद रामकृष्ण हेपट (रा. खांबजी वॉर्ड, वरोरा, जि. चंद्रपूर) या तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी केवळ गाड्या चोरायचे नाहीत, तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि गाड्यांची विक्री करण्यासाठी बनावट आर.सी. बुक देखील तयार करायचे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सदर यशस्वी कामगिरी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या नेतृत्वातील तपास पथकाने केली. या कारवाईमुळे वरोरा आणि परिसरातील वाहनधारकांनी सुटकेचा श्वास सोडला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत.



