क्राईमगोंदियाविदर्भ

डेकोरेशन व केटरिंगचे बिल काढण्यासाठी १.२० लाख लाचेची मागणी ; नगराध्यक्षावर गुन्हा दाखल

लाच मागण्याचा अजब प्रकार! तोंडी न बोलता तक्रारदाराच्या हातावरच लिहिली होती लाचेची रक्कम

तिरोडा : तिरोडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील डेकोरेशन आणि केटरिंगचे थकीत बिल काढून देण्याच्या मोबदल्यात १ लाख २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नगराध्यक्षासह एका खासगी व्यक्तीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. शनिवार, १८ जुलै रोजी एसीबीने ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. अशोक रामजीबाबू असाटी (५४, रा. तिरोडा, नगराध्यक्ष) व कैलास किसन वाघमारे (रा. स्टेशन रोड, तिरोडा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

तक्रारदार (६०) हे डेकोरेशन व केटरिंग व्यावसायिक आहेत. त्यांनी तिरोडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ दरम्यान डेकोरेशन व केटरिंगची सेवा पुरवली होती. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी २८ डिसेंबर २०२५ रोजी ‘हर्षल केटरिंग’च्या नावाने ७ लाख ७२ हजार रुपये आणि ‘उज्वला डेकोरेशन’च्या नावाने १७ लाख ५० हजार रुपये, असे एकूण २५ लाख २२ हजार रुपयांचे बिल सादर केले होते. हे बिल मंजूर व्हावे यासाठी तक्रारदार २१ मे २०२६ रोजी नगराध्यक्ष अशोक असाटी यांना भेटायला गेले असता, असाटी यांनी बिलाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली.

या प्रकरणात लाच मागण्याचा एक अत्यंत अजब प्रकार समोर आला आहे. २१ मे रोजी जेव्हा तक्रारदार बिलासाठी नगराध्यक्ष असाटी यांना भेटायला गेले, तेव्हा असाटी यांनी तोंडी पैशांची मागणी न करता, थेट तक्रारदाराच्या उजव्या हातावर ‘३ लाख २० हजार’ अशी लाचेची रक्कम लिहून दिली होती. लाचखोरीचा हा नवाच प्रकार उघडकीस आल्याने सध्या जिल्ह्यात हा मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ७ जून २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे ८ जून रोजी पंचांसमक्ष पडताळणी केली असता, नगराध्यक्ष असाटी यांनी तक्रारदाराला ६ लाख रुपयांचा चेक देण्याच्या मोबदल्यात १ लाख २० हजार रुपयांची लाच मागितली. ही रक्कम त्यांचे पीए शुभम भोयर यांच्याकडे देण्यास सांगितले. तसेच पुढील १० लाखांचा चेक मिळाल्यानंतर उर्वरित ठरलेली रक्कम आणून देण्याचे कबूल केले. त्यानुसार ९ जून रोजी एसीबीने सापळा रचला; मात्र नगराध्यक्ष व त्यांच्या पीएला संशय आल्याने त्यांनी त्यावेळी रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली.

लाचेची मागणी निष्पन्न झाल्यानंतरही रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याने, अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या फिर्यादीवरून शनिवारी (दि. १८) सकाळी १०:४३ वाजता तिरोडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून नगराध्यक्ष असाटी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर धडक कारवाई पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार चंद्रकांत करपे, हवालदार संजय बोहरे, मंगेश काहालकर, पोलीस नायक संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवणे, कैलास काटकर, दीपक बाटबर्वे आणि महिला शिपाई रोहिणी डांगे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button