
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; पोलिसांच्या दबावाला न घाबरता संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार
गडचिरोली : शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, NEET पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी, तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवरील लाठीमार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी व खासदार प्रियंका गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे म्हणाले, “देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारने तातडीने उत्तर दिले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या आंदोलनावर लाठीमार करणे ही अत्यंत लोकशाहीविरोधी बाब आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात असला, तरी आम्ही अशा दबावाला घाबरणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सातत्याने संघर्ष करत राहील.”
आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात तीव्र निदर्शने व जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेले. पोलीस कोठडीतही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.
NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा. आंदोलनकर्त्या विद्यार्थी व युवकांवर झालेल्या लाठीमाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, गटनेते तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेविका मनीषा खेवले, नगरसेविका मेघा वरगंटीवार, ज्येष्ठ नेते समशेर खान पठाण, माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, राष्ट्रीय समन्वयक कुसुम अलाम, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज ढोरे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, प्रदेश युवक काँग्रेस सचिव विवेक घोंगडे यांच्यासह जिल्हाभरातील काँग्रेसचे विविध आजी-माजी पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



