
आयआयएम नागपूर ‘InFED’ व कौशल्य विकास केंद्राचा संयुक्त पुढाकार; जिल्हाधिकारी सावन कुमार यांची प्रमुख उपस्थिती, विविध संस्थांसोबत करार
भंडारा : उद्योग, शैक्षणिक संस्था आणि शासकीय विभाग यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करून उद्योजकता विकास, स्टार्टअप्सना प्रोत्साहन, स्वयंरोजगार व स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने भंडारा येथे जिल्हास्तरीय ‘इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट राऊंड टेबल’ परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि आयआयएम (IIM) नागपूर InFED च्या ‘इंक्युबेशन-कम-बिजनेस फॅसिलिटेशन सेंटर’ (IBFC) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी सांगितले की, “भंडारात स्थापन करण्यात आलेल्या IBFC केंद्राच्या माध्यमातून नवउद्योजक, तरुण स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना योग्य मार्गदर्शन व कायदेशीर सुलभता मिळणार आहे. स्थानिक उद्योगांना आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा आराखडा तयार करून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उद्योजकतेची मानसिकता घडवणे काळाची गरज आहे.”
लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष मुरारीलाल काबरा यांनी स्थानिक उद्योगांमधील कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेचा मुद्दा मांडला. यावर उत्तर देताना कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी स्पष्ट केले की, उद्योग संघटना व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून लवकरच ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा’ तयार केला जाईल. मेटल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष पंकज सारडा यांनीही IBFC केंद्राच्या भूमिकेचे कौतुक केले.
युवकांना थेट उद्योगांशी जोडण्यासाठी विविध महाविद्यालये व उद्योगांसोबत महत्त्वाचे करार करण्यात आले: शैक्षणिक संस्था: जे. एम. पटेल महाविद्यालय, एम.आय.ई.टी. शाहापूर, मधुकरराव पांडव अभियांत्रिकी महाविद्यालय, अनुराग फार्मसी, करंजेकर अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन सेंदूरवाफा, आठवले समाजकार्य, ओॲसिस आणि मानसरामजी पाडोळे महाविद्यालय. उद्योग व संस्था (Affiliation): Reolefin Poly Plast Pvt. Ltd., RiceCity Garment, PVR Repair Junction, सिंदपुरी व आंबागड फार्मर प्रोड्युसर कंपन्या, मारिया फॅशन आणि शांत रक्षित एंटरप्रायझेस.
या वेळी आयआयएम InFED चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवाजी धवड यांनी IBFC च्या उद्दिष्टांचे सादरीकरण केले. कार्यक्रमादरम्यान जिल्हा नियोजन कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, MSRLM, MAVIM, KVK, आत्मा, NULM, जिल्हा अग्रणी बँक आणि RSETI यांच्या प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हेमंत बदर, भंडारा जिल्हा औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष सुनील रंभाळ, IBFC चे सेंटर कोऑर्डिनेटर सोनू उके यांच्यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, कंत्राटदार, उद्योग प्रतिनिधी व नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



