
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा उपक्रम; आ. सुधाकर अडबाले यांचा पुढाकार
नागपूर : नागपूर विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या विविध प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने नागपूर विभागीय बोर्ड कार्यालयात ‘समस्या निवारण सभा’ पार पडली. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या (वि.मा.शि. संघ) ‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ या उपक्रमाअंतर्गत २३ जुलै रोजी दुपारी २ ते ४:३० या वेळेत ही बैठक पार पडली. या सभेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षा केंद्र आणि मानधनाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेदरम्यान आमदार सुधाकर अडबाले यांनी बोर्ड विभागीय अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे आणि उपस्थितांसमोर शिक्षकांच्या विविध मागण्या मांडून त्या तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या: शालार्थ आयडी व मानधन: नवनियुक्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित ‘शालार्थ आयडी’ प्रकरणे त्वरित निकाली काढावीत. तसेच पेपर तपासणी व मॉडरेशनचे थकीत मानधन शिक्षकांना तातडीने अदा करावे. मानधनात वाढ: परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक, रनर, लिपीक, पर्यवेक्षक तसेच उत्तरपत्रिका तपासणाऱ्या मुख्य नियामक, नियामक व परीक्षकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवावा. परीक्षा केंद्र व्यवस्था: इयत्ता १० वी व १२ वी चे परीक्षा केंद्र देताना विद्यार्थ्यांच्या शाळेपासून फार लांबचे अंतर देऊ नये. रनर व भरारी पथक सुधारणा: ‘रनर’ पद्धतीऐवजी पूर्वीप्रमाणे अतिरिक्त संचालक नियुक्त करण्यात यावेत आणि रनर म्हणून माध्यमिक शिक्षकांचीच नियुक्ती व्हावी. तसेच भरारी पथकांमध्ये प्राथमिक शिक्षकांचा समावेश करू नये आणि भरारी पथकाचे कार्य निश्चित केले जावे.
या सभेला माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी, भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्यासह विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी, सर्व शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या विषयपत्रिकेतील सर्व प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढण्याचे आश्वासन बोर्ड प्रशासनाकडून देण्यात आले.



