
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तसेच अमर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य मा. ओमप्रकाश संग्रामे हे होते विशेष अतिथी म्हणून केंद्र प्रमुख निमसरकार व विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय अजय वानखेडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक व क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी दोन्ही महान विभूतींना अभिवादन केले.
कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाचा आढावा घेतला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा प्रेरणादायी संदेश आजही प्रत्येक भारतीयाला देशसेवेची प्रेरणा देत असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक जागृतीच्या माध्यमातून टिळकांनी राष्ट्रीय चळवळीला नवी दिशा दिली, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी पर्यवेक्षक अजय वानखेडे म्हणाले, “लोकमान्य टिळक आणि क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि स्वाभिमानाची प्रेरणा घ्यावी. अशा जयंती कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना महापुरुषांचे जीवनकार्य समजते आणि त्यांच्यामध्ये देशसेवेची भावना अधिक दृढ होते. महापुरुषांचे विचार केवळ वाचण्यापुरते न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.”
यावेळी क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग ऐकले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले बलिदान आजच्या युवकांसाठी आदर्श असून राष्ट्रासाठी समर्पणाची भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन करण्यात आले.
कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. राकेश चडगुलवार यांनी केले.



