क्राईमभंडाराविदर्भ

पैशांच्या जुन्या वादातून काकाचा खून करणाऱ्या पुतण्याला जन्मठेप

अड्याळ पोलीस ठाण्यांतर्गत ईटगाव जंगल परिसरातील २०२२ मधील घटना; ४० हजार रुपयांचा दंडही ठोठावला

भंडारा : पैशांच्या जुन्या वादाचा आणि मारहाणीचा राग मनात धरून स्वतःच्या काकाची धारदार शस्त्राने भोसकून निघृण हत्या करणाऱ्या आरोपी पुतण्याला भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. २३ जुलै २०२६ रोजी न्यायाधीशांनी आरोपीला आजन्म कारावास (जन्मठेप) आणि ४० हजार रुपये दंडाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.

जिल्ह्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ईटगाव शिवारात ३० जून २०२२ रोजी ही खळबळजनक घटना उघडकीस आली होती. अनिकेश अजाबराव क्षीरसागर (वय ४९, रा. चिखली ले-आऊट, नागपूर) असे मृत काकाचे नाव असून, संदेश राजेंद्र क्षीरसागर (वय २४, रा. नागपूर) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपी पुतण्याचे नाव आहे.

अनिकेश आणि संदेश यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून जुना वाद सुरू होता. या वादातून अनिकेश यांनी संदेशला मारहाण केली होती. याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी संदेशने काकाचा काटा काढण्याचा कट रचला. आरोपी संदेशने काका अनिकेश यांना ईटगाव-लेंडेझरी जंगल शिवारात नेले. तेथे दोघे जेवणासाठी बसले असताना संधी साधून संदेशने धारदार शस्त्राने अनिकेश यांच्या गळ्यावर गंभीर वार करून त्यांना जागीच ठार केले.

ईटगाव येथील चंद्रशेखर चौधरी यांना जंगलात मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी अड्याळ पोलिसांना माहिती दिली, ज्यावरून हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून सर्व पुरावे गोळा केले व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सत्र न्यायाधीश भारती काळे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सादर केलेले सबळ पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी संदेश क्षीरसागर याला जन्मठेप व ४० हजार रुपये दंड, तसेच भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ४०४ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता रमाकांत खत्री यांनी यशस्वी युक्तिवाद केला, तर अड्याळचे ठाणेदार सचिन तायवाडे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार सुरेश भगत यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button