
नवीन प्रशासकीय इमारतीतून मोहिमेचा शुभारंभ; उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या हस्ते सदस्यांचा सत्कार
गोंदिया : नवीन प्रशासकीय इमारत परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी मोलाचे पाऊल उचलल्याबद्दल ‘श्रीराम वृक्षारोपण आयोजन समिती’च्या सदस्यांचा उपविभागीय अधिकारी (SDO) चंद्रभान खंडाईत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. नवीन प्रशासकीय इमारतीतील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित एका छोटेखानी सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला.
श्रीराम वृक्षारोपण आयोजन समितीने गोंदिया जिल्ह्यात तब्बल ३ हजार वृक्ष लागवडीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हा एक अभिनव आणि अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी नमूद केले. या हरित मोहिमेचा शुभारंभ नवीन प्रशासकीय इमारत परिसरामध्ये वृक्षारोपण करून करण्यात आला.
यावेळी अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक कैलास गजभिये, श्रीराम वृक्षारोपण आयोजन समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर अग्रवाल, महामंत्री सुजित अग्रवाल आणि सचिव अपूर्व अग्रवाल आदी उपस्थित होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर झाडे लावून त्यांचे संगोपन केले जाणार आहे. उपस्थितांनी समितीच्या या सामाजिक व पर्यावरणपूरक कार्याचे मनापासून कौतुक केले आणि आगामी उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.



