गोंदियाविदर्भ

महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने उभारणार ‘ट्रॅक्टर स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ ; तरुणांना थेट नोकरीची संधी

शासकीय तंत्रनिकेतन येथे दरवर्षी १२० तरुणांना मिळणार मोफत मेकॅनिक प्रशिक्षण; जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

गोंदिया : जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाला मोठी चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्रसिद्ध महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या सहकार्याने गोंदियात अत्याधुनिक ‘ट्रॅक्टर स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे व इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकी दरम्यान महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक लेवीस डॉन यांच्याशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला. शासकीय तंत्रनिकेतन (Polytechnic) गोंदिया येथे हे केंद्र सुरू केले जाणार असून, येथे ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिकचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पात्र उमेदवारांना महिंद्रा कंपनीत रोजगाराची (नोकरीची) संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महिंद्रा कंपनी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील करारानुसार दरवर्षी १२० प्रशिक्षणार्थींना हे तंत्रकुशल प्रशिक्षण दिले जाईल. हा करार ३ वर्षांसाठी असणार आहे. जिल्ह्यातील नवउद्योजकांना मदत करण्यासाठी इन्क्युबेशन अँड बिझनेस फॅसिलिटेशन सेंटरतर्फे जिल्ह्यातील ५९ महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी ९० मिनिटांची विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातील. नवसाक्षर योजनेअंतर्गत आत्मसमर्पित नक्षलवादी आणि नक्षलपीडित व्यक्तींना साक्षर करून कौशल्य विकासाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर विशेष भर दिला जाईल. बैठकीत जिल्ह्याच्या कौशल्य विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करून सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या ‘किमान कौशल्य विकास कार्यक्रमास’ मंजुरी देण्यात आली.

या उपक्रमांमुळे गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होणार असून, कौशल्य विकासाच्या क्षेत्रात गोंदिया जिल्हा अधिक सक्षम होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button