
पिपली बुर्गी हद्दीतील घटनेचा पर्दाफाश ; तांत्रिक तपासाच्या आधारे पाखांजुर व एटापल्ली येथील संशयितांना अटक
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील पिपली बुर्गी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवादी (नक्षलवादी) असल्याचे भासवून बॅनर व पत्रके टाकून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या प्रभावी ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ मोहीम आणि सातत्यपूर्ण अभियानांमुळे जिल्ह्यातून नक्षलवाद्यांचे अस्तित्व संपुष्टात आले असताना, असा बनाव रचणाऱ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी पिपली बुर्गी पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही अज्ञात व्यक्तींनी आपण माओवादी असल्याचे भासवून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने पत्रके आणि बॅनर लावले होते. या घटनेची गंभीर दखल घेत गडचिरोली पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली.
तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवा अनिल मिस्त्री (वय ४८): रा. तरुणनगर, ता. पाखांजुर, जि. कांकेर (छत्तीसगड). रोहीत रंज्जीत मल्लीक (वय २५): रा. वटेली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनीच हे पत्रके व बॅनर लावल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
सदर कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गडचिरोली पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे. या प्रसंगी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, “गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावर आता एकही माओवादी शिल्लक नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना किंवा भूलथापांना बळी पडू नये आणि अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होऊ नये.” तसेच, भविष्यात कोणीही अशा प्रकारे नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.



