
नारायणनगर-बनगाव येथील घटना ; कर्करोगाने होते ग्रस्त
गोंदिया : कर्करोगाच्या आजाराला कंटाळून पोलिस हवालदाराने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आमगाव पोलिस ठाण्यांतर्गत नारायणनगर-बनगाव येथे शुक्रवारी (दि. २४) दुपारी १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान घडली. आनंद कवळू भांडारकर (५२) असे मृताचे नाव आहे. आमगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत आनंद भांडारकर (५२) हे गेल्या काही काळापासून कर्करोगाने आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नव्हती. आजारपणाचा मानसिक ताण आणि उपचारांमुळे होणारा आर्थिक भार यामुळे ते चिंतेत राहत होते. त्यातून त्यांनी घरातील हॉलमध्ये सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
याप्रकरणी त्यांचा मुलगा हर्षित आनंद भांडारकर (२७) यांनी आमगाव पोलिसांत माहिती दिली. या प्रकरणी आमगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार उईके करीत आहेत.



