चंद्रपूरविदर्भ

वीज दुरुस्तीदरम्यान अचानक समोर आला वाघ; महावितरण कर्मचाऱ्यांनी पोलवर चढून वाचवला जीव

मूल तालुक्यातील फुलझरी येथील थरार; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

चंद्रपूर : जिल्ह्यातील मूल तालुक्यात वाघांच्या वाढत्या वावरामुळे पुन्हा एकदा नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. वीजवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करत असताना अचानक समोर वाघ आल्याने महावितरण कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी थेट विजेच्या खांबावर (पोलवर) आश्रय घेतला. तब्बल एक तास कर्मचारी विजेच्या पोलवर अडकून राहिल्यानंतर वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला, ज्यानंतर कर्मचाऱ्यांनी खाली उतरून सुटकेचा निःश्वास सोडला.

मूल येथील महावितरण उपविभागांतर्गत येणाऱ्या फुलझरी गावात वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी काही कर्मचारी विजेच्या पोलवर चढून काम करत असतानाच अचानक परिसरात वाघ चालत आल्याचे दिसले. वाघाची चाहूल लागताच कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. वाघ खालीच फेऱ्या मारत असल्याने खाली उतरणे थेट मृत्यूच्या दारात जाण्यासारखे होते, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पोलवरच ताटकळत राहणे पसंत केले.

सुमारे तासभर वाघ पोलच्या अवतीभोवती फिरत होता. अखेर वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेल्यावर कर्मचाऱ्यांनी खाली उतरून उर्वरित काम पूर्ण केले. या थरारक प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, तो पाहून नागरिकांमधून आश्चर्य व भीती व्यक्त होत आहे. जंगलालगतच्या आणि संवेदनशील भागांत काम करणाऱ्या महावितरण, वनविभाग व इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने विशेष सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची वाढती संख्या आणि मानवी वस्त्यांपर्यंत होणारा त्यांचा वावर यामुळे शेतकरी, नागरिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे. या घटनेमुळे वनविभागाने तत्काळ या भागात गस्त वाढवून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button