क्राईमचंद्रपूरविदर्भ

संतापजनक घटना ; १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून घरात डांबले

कुटुंबीयांच्या प्रसंगावधानामुळे मुलीची सुटका; जाब विचारणाऱ्या बहिणीला मारहाण करत आरोपी पसार

चंद्रपूर : शाळेत गेलेल्या अवघ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन घरात डांबून ठेवल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी तत्परता दाखवत थेट आरोपीचे घर गाठल्यामुळे या अल्पवयीन मुलीची सुटका होऊ शकली. या प्रकरणी आरोपी लोकेश चव्हाण (रा. राजीवनगर, चंद्रपूर) याच्याविरोधात अपहरणासह मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इयत्ता नववीत शिकणारी ही १४ वर्षीय मुलगी २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे सायकलने शाळेत गेली होती. मात्र, सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. शाळेत चौकशी केली असता ती त्या दिवशी शाळेत आलीच नसल्याचे समोर आले. त्यानंतर तिच्या वर्गमैत्रिणीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ती सोनचाफा मंदिरापर्यंत आल्यानंतर तिचा मित्र लोकेश चव्हाण याच्यासोबत निघून गेल्याचे समजले.

माहिती मिळताच पीडित मुलीची आई, भाऊ आणि दोन मोठ्या बहिणींनी थेट राजीवनगर येथील लोकेश चव्हाण याचे घर गाठले. तेथे अंगणात मुलीची सायकल उभी होती, मात्र मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप लावले होते. कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला असता आतून मुलीचा आवाज आला. त्याच वेळी आरोपी लोकेश तेथे पोहोचला. कुटुंबीयांनी कुलूप उघडण्यास सांगितले असता त्याने हुज्जत घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

दबावानंतर आरोपीने कुलूप उघडताच मुलगी आत आढळली. तिने लोकेशने पळवून आणून डांबल्याचे सांगितले. यावर मुलीच्या मोठ्या बहिणीने जाब विचारला असता संतापलेल्या आरोपी लोकेशने तिला पाठीवर व मानेवर बुक्क्यांनी मारहाण केली आणि “कोणाला काही सांगितले तर जिवे मारून टाकीन,” अशी धमकी देऊन तेथून पळ काढला.

या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपी लोकेश चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५ (२), १२७ (२), १३७ (२), ३५१ (३) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृणाल रामटेके करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button