गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचिरोली येथे २६ जुलै कारगिल विजय दिन देशभक्तिपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १९९९ मध्ये कारगिल युद्धात भारतीय सैन्याने दाखविलेल्या अ‌द्वितीय शौर्य, पराक्रम आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, देशसेवा आणि कर्तव्यनिष्ठेची भावना दृढ करण्याच्या उ‌द्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाल अध्यक्ष म्हणून वि‌द्यालयाचे पर्यवेक्षक अजय वानखेडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सैनिकी निदेशक ऋषी वंजारी, हरिप्रसाद ध्यानी चारही हाउस चे हाउस मास्टर पटेल, चडगुलवार लोखंडे, बोबाटे हे होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्राचार्य, शिक्षक व वि‌द्यार्थ्यांनी शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या अमर बलिदानाला विनम्र अभिवादन केले. दोन मिनिटे मौन पाळून देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर सैनिकांना सामूहिक श्र‌द्धांजली वाहण्यात आली.

यावेळी वि‌द्यालयाचे पर्यवेक्षक अजय वानखेडे यांनी वि‌द्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “कारगिल विजय दिन हा केवळ भारताच्या लष्करी विजयाचा दिवस नाही, तर भारतीय सैनिकांच्या अदम्य साहस, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या जवानांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देत जगासमोर भारतीय सैन्याचे शौर्य सिद्ध केले. त्यांच्या त्यागाचे स्मरण करून प्रत्येक वि‌द्यार्थ्याने राष्ट्रसेवा, शिस्त आणि देशभक्तीची भावना जोपासली पाहिजे.”

प्रा. गजानन ढोले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “कारगिल युद्धाने संपूर्ण जगाला भारतीय सैनिकांचे धैर्य, सामरिक कौशल्य आणि अदम्य इच्छाशक्ती दाखवून दिली. विजय सहज मिळत नाही; त्यासाठी समर्पण, कठोर परिश्रम आणि बलिदान आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी कारगिलच्या वीरांकडून संकटांशी धैर्याने सामना करण्याची आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची प्रेरणा घ्यावी.”

कार्यक्रमात सैनिकी निदेशक ऋषी वंजारी शिक्षकांनी ऑपरेशन विजय, कारगिल युद्धाची पार्श्वभूमी, टायगर हिल, तोलोलिंग यांसारख्या महत्त्वाच्या लढाया तसेच कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे, ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव, रायफलमन संजय कुमार यांसारख्या शूरवीरांच्या पराक्रमाची माहिती वि‌द्यार्थ्यांना दिली. प्रसंगी हरिप्रसाद ध्यानी यांनीही सर्वाना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही कारगिल युद्धावर आधारित भाषणे, देशभक्तिपर घोषवाक्ये आणि मनोगते सादर करून शहीद जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी वि‌द्यार्थ्यांनी “राष्ट्र प्रथम” ही भावना जोपासण्याची, भारतीय संविधानाचा आदर करण्याची, शिस्तबद्ध जीवन जगण्याची आणि देशाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. संचालन योग नैताम या विद्यार्थ्याने केले तर आभार तारण घुबडे यांनी केले कार्यक्रमाला वि‌द्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिक्षकवृंदांच्या सहकार्याने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button