
पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्याकडून साकोली टीमला ३.५ लाखांचे रिवॉर्ड जाहीर
भंडारा : ओडिशा राज्यातून तब्बल १९९.५६० किलोग्रॅम गांजा नागपूर, अमरावतीमार्गे थेट मुंबईकडे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला पोलिसांनी सेंदूरवाफा टोलनाक्यावर मध्यरात्री थरारक कारवाई करत पकडले. या कारवाईत पोलिसांनी ९९ लाख ७८ हजार रुपये किमतीचा गांजा आणि ३५ लाख रुपयांचा ट्रक असा एकूण १ कोटी ३४ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, २६ ते २७ जुलैच्या मध्यरात्री १२:४९ वाजता रायपूर-राजनांदगाव-देवरी-साकोली या राष्ट्रीय महामार्गावरून ‘WB 23 F 8785’ क्रमांकाचा ट्रक गांजा घेऊन नागपूरच्या दिशेने जात होता. या माहितीच्या आधारे साकोली पोलिसांनी सेंदूरवाफा टोलनाक्यावर तातडीने नाकेबंदी करून सापळा रचला. संशयित ट्रक टोलनाक्यावर पोहोचताच त्याला अडवून पंचांसमक्ष पाहणी करण्यात आली.
ट्रकमध्ये वर केबलचे मोठे बंडल ठेवून त्याखाली गांजाच्या पिशव्या चुंगड्यांमध्ये हुशारीने लपवून ठेवण्यात आल्या होत्या. सुरुवातीला चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी सखोल तपासणी करताच तस्करीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ट्रक चालक पंकजकुमार भूषण यादव (वय ३०, रा. खुजहटिटा, मांजी, बिहार) आणि क्लिनर तथा वाहन मालक बापी बादल मातीक (वय ३८, रा. नवग्राम, पश्चिम बंगाल) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही आंतरराज्यीय तस्करी नियमित चालायची का? हा गांजाचा साठा मुंबईत कोणाला पोहोचवला जाणार होता? आणि या रॅकेटमागे कोणता मुख्य सूत्रधार आहे? या दिशेने साकोली पोलीस आता कसून तपास करत आहेत.
अत्यंत गुप्ततेने आणि धैर्याने ही मोठी मोहीम यशस्वी केल्याबद्दल भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी साकोली उपविभागीय अधिकारी कार्यालयाला ३ लाख ५० हजार रुपयांचे विशेष रिवॉर्ड जाहीर केले आहे. तसेच त्यांनी साकोली पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण कारवाईचा आढावा घेतला आणि पोलीस पथकाचे भरभरून कौतुक केले.
या मोहिमेचे संपूर्ण श्रेय पोलिसांना आणि सुजाण नागरिकांना आहे. जागर नशामुक्त अभियान १.० या उपक्रमाचे हे फलित आहे. तस्करांविरोधात सुरू असलेल्या कारवाया आणि मोहीम अधिक तीव्र केल्या जातील. नशामुक्त समाजनिर्मितीसाठी आम्ही सदैव योगदान देत राहू.
– नूरुल हसन, पोलीस अधीक्षक, भंडारा



