देश -विदेश

दिल्लीत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या अधिवेशाला प्रारंभ

पत्रकारितेचे वर्तमान, बदलते स्वरूप, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, कृत्रिम बुद्धिमत्ता, पत्रकारांचे प्रश्न आणि माध्यम क्षेत्राच्या भवितव्यावर दोन दिवस महामंथन 

नवी दिल्ली : व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या वतीने आयोजित दोन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनाचा प्रारंभ दिल्ली येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात झाला. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, ज्येष्ठ पत्रकार तथा इंडियन लँग्वेज न्यूजपेपर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के तसेच देशातील विविध राज्यांचे अध्यक्ष व मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.

अधिवेशनाच्या प्रारंभी भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकार, संपादक, डिजिटल माध्यम प्रतिनिधी, विविध राज्यांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सभागृहात देशाच्या विविध भाषांचे, संस्कृतीचे आणि पत्रकारितेच्या विविध प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारे शेकडो पत्रकार उपस्थित असल्याने राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखे चित्र पाहायला मिळाले.

या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये भारतीय पत्रकारितेपुढील सध्याची आव्हाने, बदलते तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमांची वाढती ताकद, सोशल मीडिया आणि पत्रकारितेतील जबाबदारी, कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय मुळे माध्यम क्षेत्रात होत असलेले बदल, फेक न्यूजचे आव्हान, पत्रकारांची सुरक्षा, पत्रकार कल्याण, पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण तसेच माध्यम क्षेत्राचे भवितव्य अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा आणि विचारमंथन करण्यात येत आहे.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून बदलत्या काळात पत्रकारांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेत सत्य, निष्पक्षता आणि सामाजिक बांधिलकी जपत काम करण्याची गरज अधोरेखित केली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात पत्रकारितेची विश्वासार्हता आणि मानवी मूल्ये अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के यांनी आपल्या प्रास्ताविकात व्हॉईस ऑफ मीडिया ही केवळ पत्रकारांची संघटना नसून पत्रकारांच्या सन्मान, सुरक्षितता, सामाजिक न्याय आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी जागतिक चळवळ असल्याचे स्पष्ट केले. देशभरातील पत्रकारांना एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे आवाज उठविण्याचे काम संघटना सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिवेशनामध्ये पत्रकारांच्या निवास, आरोग्य, विमा संरक्षण, शिक्षण, कौशल्य विकास, निवृत्ती सुरक्षा, डिजिटल पत्रकारिता, महिला पत्रकारांच्या समस्या, ग्रामीण पत्रकारांची स्थिती तसेच पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात विविध विषयांवर विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, वरिष्ठ पत्रकार आणि मान्यवर या सत्रांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

देशभरातून सहभागी झालेल्या राज्याध्यक्षांनी आपल्या राज्यांतील पत्रकारितेची परिस्थिती, स्थानिक प्रश्न आणि संघटनात्मक उपक्रमांची माहिती मांडली. विविध राज्यांतील अनुभवांची देवाणघेवाण झाल्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर समान धोरण तयार करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत अनेक प्रतिनिधींनी व्यक्त केले.

संदीप काळे म्हणाले की, या अधिवेशनात पत्रकार कल्याण, पत्रकार संरक्षण, डिजिटल माध्यमांचे नियमन, पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय उपक्रम, पत्रकारांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी विविध महत्त्वपूर्ण ठराव मंजूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उत्साह, विचारमंथन आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या वातावरणात सुरू झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनाकडे देशभरातील पत्रकारांचे लक्ष लागले असून पत्रकारितेच्या भविष्यासाठी दिशा देणारे हे अधिवेशन ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

संघटनात्मक दृष्टिकोनातून हे राष्ट्रीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. देशातील विविध राज्यांतील पत्रकार, पदाधिकारी आणि प्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर आणून संघटनेची वैचारिक, संघटनात्मक आणि कार्यात्मक एकजूट अधिक मजबूत करण्याचे काम या अधिवेशनातून होत आहे. विविध राज्यांमध्ये राबविण्यात येणारे उपक्रम, स्थानिक समस्या, यशस्वी प्रयोग आणि संघटन विस्ताराचे अनुभव यांची देवाणघेवाण होत असल्याने राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावी आणि सुसंघटित कार्यपद्धती विकसित करण्यासाठी हे अधिवेशन दिशादर्शक ठरत आहे.

याशिवाय, पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, पत्रकार कल्याण, संघटन विस्तार, डिजिटल युगातील पत्रकारांची भूमिका आणि भविष्यातील राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. अधिवेशनात मंजूर होणारे विविध ठराव, राज्यनिहाय समन्वयाची रणनीती आणि आगामी राष्ट्रीय उपक्रमांची आखणी यामुळे व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्हीओएम इंटरनॅशनल फोरमची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होणार असून देशभरातील पत्रकारांना एक सक्षम, प्रभावी आणि एकसंघ नेतृत्व मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button