
स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
गडचिरोली, दि. २५ ऑगस्ट : जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत १९ गोवंशीय जनावरांसह दोन चारचाकी वाहने असा एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २४ ऑगस्ट रोजी रात्री मौजा गेवर्धा ते केशोरी मार्गावर करण्यात आली.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांसह अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गेवर्धा ते केशोरी मार्गावर दोन वाहनांमधून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांनी गेवर्धा गावाजवळ सापळा रचला. यावेळी संशयास्पदरीत्या येणारा एक ट्रक व महिंद्रा बोलेरो पिकअप थांबवून पोलिसांनी तपासणी केली. दोन्ही वाहनांमध्ये गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयपणे कोंबून भरल्याचे आढळून आले. तसेच जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवाना आरोपींकडे नसल्याचे तपासात समोर आले.
तपासणीदरम्यान टीजी १२ यू ४८९६ क्रमांकाच्या अशोक लेलँड ट्रकमध्ये ११ गायी व २ बैल, अशी एकूण १३ जनावरे आढळून आली. त्यांची अंदाजे किंमत १ लाख ८५ हजार रुपये आहे. या ट्रकची अंदाजे किंमत १२ लाख रुपये आहे.
तर एमएच ३५ एजे ४६०१ क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये ४ गायी व २ बैल, अशी एकूण ६ जनावरे आढळून आली. त्यांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये, तर वाहनाची किंमत सुमारे ५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अशाप्रकारे दोन्ही वाहनांमधील १९ गोवंशीय जनावरांची एकूण किंमत २ लाख ६५ हजार रुपये, तर दोन्ही वाहनांसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १९ लाख ६५ हजार रुपये आहे.
या प्रकरणी शेख इब्राहिम शेख इस्माईल (वय ४०, रा. मेहबुब नगर, पिली नदी, उप्पलवाडी, नागपूर) आणि मुफस्सील कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी (वय २५, रा. चिराग अली चौक, टेका नई बस्ती, नागपूर) यांच्याविरुद्ध कुरखेडा पोलीस ठाण्यात अप. क्र. १९१/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



