
शेतकऱ्यांचे विजयभाऊ वडेट्टीवार यांना निवेदन; अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात कारवाईसाठी पाठपुरावा
गडचिरोली , दि ३१ ऑगस्ट : शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत मुलचेरा तालुक्यात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुलचेरा शाखेतील काही कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीच्या रकमेत तफावत असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करत, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी कॅबिनेट मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे निवेदन सादर केले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली हा पाठपुरावा करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या काही शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये प्रत्यक्ष थकीत असलेली मुद्दल व व्याजाची रक्कम आणि कर्जमाफीसाठी दाखविण्यात आलेल्या रकमेत तफावत आढळून आली आहे. काही प्रकरणांमध्ये कर्जाच्या प्रत्यक्ष मुद्दल रकमेपेक्षा कमी रक्कम कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, काही शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील व्याजाची रक्कम कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी, कर्जमाफीचा लाभ मिळूनही उर्वरित रक्कम भरण्याची जबाबदारी शेतकऱ्यांवर येत असल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे.
‘कर्जमाफीची रक्कम नेमकी कशी निश्चित करण्यात आली?’
शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रमुख प्रश्नांमध्ये कर्जखात्यावरील प्रत्यक्ष थकीत रक्कम, शासनाकडून मंजूर झालेली कर्जमाफी आणि बँकेच्या खात्यात दाखविण्यात आलेली रक्कम यामध्ये तफावत का निर्माण झाली, हा प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे संबंधित सर्व कर्जखात्यांचे स्वतंत्रपणे ऑडिट करून प्रत्यक्ष कर्जरक्कम आणि कर्जमाफीची रक्कम यांची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बँक अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित त्रुटी शासनस्तरावर झाल्याचे सांगण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, या प्रकरणात नेमकी चूक कुठे झाली, याची अधिकृत चौकशी होणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पात्र शेतकऱ्यांना पूर्ण लाभ मिळण्याची मागणी
कर्जमाफी ही शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने राबविलेली योजना आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही स्तरावर त्रुटी अथवा अनियमितता झाली असल्यास त्याची तातडीने दखल घेऊन पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा संपूर्ण लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित कर्जखात्यांची तपासणी करावी, कर्जमाफीच्या रकमेत झालेली तफावत दूर करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, पंकज गुड्डेवार, रामभाऊ मेश्राम, रजनीकांत मोटघरे, कुणाल पेंदोरकर, रुपेश टिकले, नंदू वाईलकर, कालिदास कुसनाके, सुधाकर गुड्डी सेडमाके, तिरमा गुड्डी सेडमाके, शालीक सेडमाके, सरपत नैताम, बिचेंगा सिडाम, महागाव ग्रामपंचायतीचे सदस्य राजू दुर्गे, अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांच्यासह शेतकरी, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणा या तक्रारीची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



