
ग्रामीण रुग्णालय, धान खरेदी केंद्राच्या प्रश्नांवरही खासदारांनी दिले आश्वासन
सिरोंचा : तालुक्यातील अनेक भागांत वारंवार खंडित होणारे मोबाइल नेटवर्क आणि अनियमित विद्युतपुरवठा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी पुढाकार घेतला आहे. तेलंगणा राज्यातून विद्युतपुरवठा सुरू करण्याबाबत आणि तालुक्यात अधिक क्षमतेचे मोबाइल टॉवर उभारण्याबाबत ते येत्या महिनाभरात तेलंगणा सरकारशी चर्चा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रमुख नेत्यांच्या भेटी आणि समस्यांवर चर्चा
खासदार डॉ. किरसान यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस गटाच्या नेत्या भाग्यश्री आत्राम आणि ऋतुराज हलगेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी सिरोंचा ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. हे काम लवकर मार्गी लागावे यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे खासदार किरसान यांनी सांगितले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार पेंटा रामा तलांडी, कोंडा विश्वेश्वरराव, इम्तियाज खान, रंजित गागापूरपू, सपना तोकला, श्याम बेजनीवार, सतीश जवाजी, विजय रंगुवार, रवी सलमवार, एमडी शानू आणि अहमद अली या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
ग्रामीण रुग्णालय आणि धान खरेदी केंद्राचे प्रश्न
सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक समस्या असून त्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी नगरसेवक रंजित गागापूरपू आणि इम्तियाज खान यांनी खासदारांकडे केली. यावर आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन खासदार किरसान यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
याचबरोबर, उन्हाळी हंगामातील धान शेतकऱ्यांकडे जमा झाले असून, त्याला योग्य हमीभाव मिळावा यासाठी धान खरेदी केंद्रे लवकर सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सिरोंचा तालुक्यातील या आणि इतर विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची विनंतीही पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. नामदेव किरसान यांना केली.



