
गोंदिया : आयुक्त, वैद्यकीय संशोधन व आयुष यांच्या आदेशानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया यांच्या अधिनस्त असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय आणि केटीएस रुग्णालय, गोंदिया येथे ‘हिमालया बेबी केअर’ युनिट स्थापित करण्यात आले आहे. १६ जून २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते या सुविधेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिगंबर मरसकोल्हे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलिमा पोयाम, बालरोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. धांदे, स्त्री रुग्ण विभागाच्या समाजसेवा अधीक्षक गोपाली खोटे व पूजा डांगोरे, अधिपरिचारिका नीलम शुक्ला, समाजसेवा अधीक्षक मारोती कुचनकर, रोशन मस्के, योगेश सोनवणे, निलेश डांगोरे, हरिश्चंद्र कटरे, अजय सोळंकी तसेच संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी आणि हिमालया कंपनीचे प्रतिनिधी राकेश उपस्थित होते.
अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्या हस्ते ‘हिमालया बेबी केअर’ युनिटचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. घोरपडे यांनी औषधी द्रव्य विभाग, मंत्रालय मुंबई आणि BULLS EYE MEDIA PVT. LTD कंपनी यांच्या सहकार्याने ‘हिमालया बेबी फिडिंग पॉड’ मार्फत रुग्णालयात दाखल होणाऱ्या नवजात बालकांच्या मातांना व नवजात शिशुंना लाभ मिळावा, या उद्देशाने ही उपयुक्त आणि लाभदायक सुविधा उपलब्ध झाल्याचे नमूद केले. या नवीन सेवेमुळे रुग्णालयात मिळणाऱ्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या सुविधेमुळे नवजात शिशुंच्या काळजीसाठी आणि मातांना स्तनपानासाठी अधिक सुरक्षित व सोयीस्कर वातावरण उपलब्ध होणार आहे.



