
जिल्ह्यासाठी मोठा दिलासा ; वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होणार
गडचिरोली : गडचिरोली ते आरमोरी या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाला (NH-353C) अखेर फोर-लेनचा दर्जा मिळाला आहे. या निर्णयामुळे गडचिरोलीकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे, ज्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. माजी खासदार आणि भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी गेली अनेक वर्षे या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वारंवार मागणी करून हा प्रकल्प मार्गी लावला.
मार्ग: आरमोरी ते गडचिरोली (NH-353C) लांबी: ३६.९०० किमी कामाचा प्रकार: रस्त्याचे पुनर्वसन, उन्नतीकरण आणि फोर-लेनमध्ये रूपांतरण पद्धत: एचएएम (Hybrid Annuity Mode) या मार्गासाठी आवश्यक असलेली वन विभागाची (Forest) मंजुरी मिळवणे हे एक मोठे आव्हान होते, ज्यामुळे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यास विलंब होत होता. मात्र, डॉ. अशोक नेते यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही अडचण दूर झाली.
या प्रकल्पाच्या मंजुरीबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. अशोक नेते म्हणाले, “हा गडचिरोली-नागपूर महामार्गावरील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. रस्ते चांगले असतील तरच जनजीवन सुरक्षित राहते. नागरिकांच्या या महत्त्वाच्या मागणीस अखेर न्याय मिळाला आहे. या महत्त्वपूर्ण मदतीसाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मनापासून आभारी आहे.”
हा रस्ता गडचिरोली जिल्ह्यासाठी ‘जीवनवाहिनी’ ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून, वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल.



