
पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते सन्मान; स्वातंत्र्यदिनी मानवतेचे सर्वोच्च उदाहरण
भंडारा : मानवतेचे सर्वोच्च उदाहरण देत, आपल्या आप्तांचे अवयवदान करून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या दोन कुटुंबांचा भंडारा येथे स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते या कुटुंबांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल गौरवण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे, जिल्हाधिकारी सावन कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर आदी उपस्थित होते.
पहिल्या घटनेत, ब्रह्मणी, ता. पवनी येथील आवेश हरिदास देशमुख (वय ३४) यांचा २ फेब्रुवारी २०२४ रोजी अपघातात मेंदू मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. या कठीण प्रसंगी त्यांची आई सौ. शोभा हरिदास देशमुख आणि भाऊ श्री. आशिष हरिदास देशमुख यांनी आवेश यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे दोन मूत्रपिंड, एक यकृत आणि दोन डोळे दान करण्यात आले, ज्यामुळे पाच गरजू लोकांना जीवदान मिळाले. स्वातंत्र्यदिनी त्यांच्या या महान कार्यासाठी देशमुख कुटुंबाचा गौरव करण्यात आला.

दुसऱ्या एका घटनेत, बेला येथील रामदास गणपत सिंगनजुडे (वय ४९) यांचा २२ फेब्रुवारी २०२४ रोजी अपघातात मेंदू मृत घोषित झाला. या दुःखाच्या परिस्थितीतही त्यांच्या पत्नी सौ. मालती रामदास सिंगनजुडे आणि मुलगा श्री. नयन रामदास सिंगनजुडे यांनी अवयवदानाचा महान निर्णय घेतला. त्यांच्या दानामुळे रामदास यांचे दोन मूत्रपिंड, एक यकृत आणि दोन डोळे दान होऊन पाच लोकांचे जीवन सुखमय झाले. त्यांच्या या अतुलनीय योगदानालाही स्वातंत्र्यदिनी सन्मानित करण्यात आले.
या दोन्ही घटनांनी ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान’ अंतर्गत अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले असून, मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश कसा आणता येतो, याचा संदेश दिला आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये अवयव दान हे सर्वश्रेष्ठ दान असून ह्यामुळे ज्या गरजू रुग्णांना अवयवदान केले जाते. त्यांच्या माध्यमातून नातेवाईक आपल्या आप्तेष्टांची प्रतिमा न्याहाळत असतात तसेच दाता आणि स्वीकारणारा यांचे आप्तेष्ट सदैव समाधानी आणि त्यांचे स्मरण निरंतर करीत असतात सर्वांना आवाहन आहे की, वरील कुटुंबांप्रमाणे आपण सुद्धा इतरांना जीवनदान देण्याकरिता अवयदान करावे.
– डॉ. दीपचंद कृष्णाजी सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा



