गडचिरोलीविदर्भ

६३ वर्षांच्या संघर्षानंतर नवीन लाडज गावाला मिळाला स्वतंत्र महसुली दर्जा

माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वाचा ऐतिहासिक विजय

देसाईगंज : तब्बल ६३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि सातत्यपूर्ण संघर्षानंतर ‘नवीन लाडज’ गावाला अखेर महसुली गावाचा स्वतंत्र दर्जा प्राप्त झाला. १९६१-६२ मध्ये आलेल्या महापुरामुळे जुने लाडज गाव उजाड झाल्यानंतर रहिवाशांचे पुनर्वसन करून ‘नवीन लाडज’ वसविण्यात आले होते. मात्र या गावाला महसुली मान्यता न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये कायम असंतोष होता. शुक्रवारी झालेल्या ऐतिहासिक कार्यक्रमातून हा लढा यशस्वी ठरला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे प्रक्रिया पूर्ण करून महसुली सातबारा वाटप सोहळा आयोजित करण्यात आला. महसूल मंत्री बावनकुळे व पालकमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते ग्रामस्थांना सातबारा देण्यात आले.

गावाला महसुली दर्जा मिळवून देण्यात माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर ग्रामस्थांचे स्वप्न पूर्ण झाले. कार्यक्रमात गजबे यांचा शाल-श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार कृष्णा गजबे, तहसीलदार प्रीती डूडूलकर, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा आमगाव-लाडजचे माजी सरपंच योगेश नाकतोडे, माजी ग्रामपंच सदस्य आनंदराव वाढई, भाग्यवान पारधी, भागवत समिती अध्यक्ष संतगिरीजी गिरी, सामाजिक कार्यकर्ते परसराम आदे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करताना, “हा ६३ वर्षांचा लढा आज फळाला आला असून गावाचे स्वप्न साकार झाले, याचे श्रेय प्रामुख्याने माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या ठाम नेतृत्वाला जाते,” असे मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button