अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २,२१५ कोटी मंजूर

नुकसानीच्या निकषांमध्ये शिथिलता ; आठ ते दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम
मुंबई : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला असून, आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांसाठी २,२१५ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ही मदत येत्या आठ ते दहा दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, जिथे घरे, शेती आणि जनावरांचे नुकसान झाले आहे, तिथे आवश्यकतेनुसार निकषांमध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल.” पंचनामे पूर्ण झालेल्या तालुक्यांना एकत्रित आदेशाची वाट न पाहता त्वरित आर्थिक मदत वितरित केली जात आहे. मृत्यू, जनावरांचे नुकसान आणि घरांच्या नुकसानीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मदत वाटपाचे अधिकार देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल, परंतु शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही.
जळगाव, धाराशिव, सोलापूर, बीड आणि परभणीसह अनेक जिल्ह्यांत बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या बचावकार्यात गुंतल्या असून, अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
पुढील काळात २७-२८ सप्टेंबर रोजी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे, त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः उद्या पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत.



