गडचिरोलीविदर्भ

सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर ; मतांसाठी कोट्यावधींच्या बाता, शेतकऱ्यांसाठी ठणठणाट

डाव्या पक्षांची मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभांवर टिका

गडचिरोली : वाढती महागाई आणि नैसर्गिक आपत्तीमुळे धान शेती प्रचंड अडचणीत सापडलेली असतांनाही सरकारने योग्य हमीभाव वाढीकडे कानाडोळा करीत धान उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याने धान उत्पादक पट्ट्यात दौरे करून मते मागण्याचा कोणताही अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नसल्याची घणाघाती टीका शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केली आहे.

शेतकरी कामगार पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मागील काही दिवसांपासून पासून जिल्हाभरात शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करत धानाला साडेतीन हजार रुपये हमीभाव दिल्याशिवाय जिल्ह्यातील एकही शासकीय धान खरेदी केंद्र सुरु होवू देणार नाही, असा इशारा शासनाला दिला होता. नगर परिषदेच्या निवडणुक प्रचारानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुर्व विदर्भातील धान पट्ट्यात प्रचार सभांमध्ये लाडकी बहिण आणि इतर योजनांचा गवगवा करीत आहेत. खते – बियाणांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटले. मागील सहा वर्षांपासून सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावात ठोस वाढ लागू करु शकलेले नाही. मतांसाठी लाडकी बहिण योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च करणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या तिजोरीत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठणठणाट का आहे? असा सवालही भाई रामदास जराते यांनी उपस्थित केला आहे.

२०२५ – २६ या खरीप हंगामाकरिता सामान्य धानाला केवळ १५६९/- रुपये उत्पादन खर्च धरून दीडपट हमीभाव फक्त २३६९/-  रुपये तर ‘अ’ श्रेणी धानाला २३८९/-  रुपये हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांच्या घामाची चेष्टा करणाऱ्या फडणवीस सरकारने धानाला साडेतीन हजार हमीभाव न दिल्यास येणाऱ्या दिवसांत मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नसल्याचा इशारा देवून धान पट्ट्यातील जनतेने निवडणुकांमध्ये धडा शिकवावा असे आवाहनही भाई रामदास जराते यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button