
धान विक्रीचे पैसे आणि गहाण ठेवलेले दागिने आगीच्या भक्ष्यस्थानी ; शॉर्ट सर्किटमुळे पुष्पराज हटवार यांचे कुटुंब उघड्यावर
पवनी : तालुक्यातील कोसरा येथे गुरुवारी (५ मार्च) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका शेतकरी कुटुंबाचे आयुष्यभराचे स्वप्न राखेत मिसळले आहे. पुष्पराज आबाजी हटवार (३३) यांच्या दुमजली मातीच्या घराला लागलेल्या या आगीत ४ तोळे सोन्याचे दागिने, ४ लाख रुपयांची रोकड आणि संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी पुष्पराज हटवार यांच्या दुमजली मातीच्या घराला अचानक आग लागली. हे घर जुने आणि लाकडी संरचनेचे असल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. आगीचे लोळ पाहून गावकरी आणि शेजाऱ्यांनी मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, परंतु आगीचा वेग इतका प्रचंड होता की अवघ्या काही वेळातच संपूर्ण घर कवेत घेतले.
पुष्पराज हटवार यांनी चार दिवसांपूर्वीच धानाच्या चुकाऱ्यापोटी मिळालेली ४ लाख रुपयांची रक्कम बँकेतून काढली होती. या पैशातून सोसायटीची थकबाकी भरणे आणि पुढील वर्षीच्या शेतीची व्यवस्था करायची होती. मात्र, आगीत या नोटांची बंडले जळून कोळसा झाली. तसेच, शेतीसाठी पतसंस्थेकडे गहाण ठेवलेले ४ तोळे सोन्याचे दागिने त्यांनी काही दिवसांपूर्वीच सोडवून आणले होते, ते सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत भूते यांनी गावकऱ्यांच्या मदतीने आग इतर घरांपर्यंत पसरू नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पवनी नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली, मात्र तोपर्यंत आगीने सर्व काही भस्मसात केले होते. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि गावच्या तलाठ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
या घटनेमुळे हटवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शासनाने त्यांना तात्काळ विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी कोसरा ग्रामस्थांनी केली आहे.



