क्राईमगडचिरोलीविदर्भ

शेतात लागवड केलेला ६८ लाखांचा गांजा जप्त, आरोपीला अटक

​गडचिरोली : जिल्ह्यात अवैध कारवायांना आळा घालून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिलेल्या कडक निर्देशानंतर गडचिरोली पोलीस दल पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’ वर आले आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक गुन्हे शाखा आणि धानोरा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धानोरा तालुक्यातील मोहली येथे शेतात अवैधरित्या लागवड केलेला तब्बल ६८ लाख १२ हजार ५०० रुपयांचा अंमली पदार्थ (गांजा) जप्त केला आहे. याप्रकरणी ईश्वर सखाराम पुंघाटे (वय ५० वर्ष) यास अटक करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली कि, मोहली येथील रहिवासी ईश्वर पुंघाटे याने आपल्या शेतशिवारात अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) ची लागवड केली आहे. या माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि धानोरा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने तातडीने मोहली गाठले. ​कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचांसमक्ष शेताची झडती घेतली असता, तिथे हिरवट रंगाचे, लहान-मोठी फुले असलेले गांजाचे एकूण ९१ ओलसर झाडे लागवड केलेले मिळून आले.

​पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या कॅनबिस वनस्पती (गांजा) चे एकूण वजन १३६.२५ किलोग्रॅम भरले. बाजारभावाप्रमाणे ५०,००० रुपये प्रति किलो दराने या गांजाची एकूण किंमत ६८ लाख १२ हजार ५०० रुपये आहे. आरोपीने हा गांजा विक्रीच्या उद्देशानेच आपल्या शेतात पिकवला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

​या प्रकरणी आरोपी ईश्वर सखाराम पुंघाटे याच्याविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात १४ मे २०२६ रोजी अपराध क्रमांक ६५/२०२६, कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS एक्ट) १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास धानोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) प्रशांत श्रीकृष्ण जंगले करत आहेत.

सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि भगतसिंग दुलत, धानोराचे सपोनि प्रशांत जंगले आणि अंमलदारांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली. जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button