गडचिरोलीविदर्भ

शिष्यवृत्ती परीक्षेत गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध अभ्यासाचे फळ; यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार

गडचिरोली : शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळख असलेल्या येथील ‘गोंडवाना सैनिकी विद्यालया’च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये दैदीप्यमान यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करत घवघवीत यश मिळविले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी मारणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार नागपुरे, राघव भांडेकर, प्रेम कुनघाडकर आणि यथार्थ शेंडे यांचा समावेश आहे. या यशाने संपूर्ण विद्यालय परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची कठोर मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची जोड होती. त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक संतोष कुळमेठे, भूपेंद्र चौधरी, शाहिद शेख, शाहदुल्ला खान आणि रमण गागापूरवार यांनी विद्यार्थ्यांची वैयक्तिक तयारी करून घेतली होती. पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि शिक्षकांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे आणि पर्यवेक्षक अजय वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशीच जिद्द कायम ठेवून यशाची शिखरे गाठावीत,” अशी अपेक्षा प्राचार्य संग्रामे यांनी व्यक्त केली.

या सोहळ्याला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोंडवाना सैनिकी विद्यालयाची ही शैक्षणिक परंपरा या यशाने अधिकच उजळून निघाली असून, प्रशासनाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button