
लाल किल्ल्यावर रंगणार ‘जनजाती सांस्कृतिक समागम’; माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी दाखवली हिरवी झेंडी
देसाईगंज : “धर्म संस्कृतीची रक्षा कोण करणार? आम्ही करणार, आम्ही करणार!” अशा गगनभेदी घोषणा आणि अभूतपूर्व उत्साहात शुक्रवारी देसाईगंज रेल्वे स्थानकावरून विदर्भाचे प्रतिनिधीत्व करणारे ३५० हून अधिक जनजाती बांधव दिल्लीकडे रवाना झाले. आगामी २४ मे रोजी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आयोजित भव्य ‘जनजाती सांस्कृतिक समागम’ (महासंगम) मध्ये हे बांधव सहभागी होणार आहेत.
दिल्लीला जाणाऱ्या या जथ्याला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून निरोप देण्यात आला. यावेळी रेल्वे स्थानक परिसर पांढऱ्या व निळ्या रंगाच्या टोप्या परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी गजबजला होता. हातात विदर्भ प्रांत आणि गडचिरोली जिल्ह्याचे फलक घेतलेल्या या बांधवांनी आपली एकजूट आणि सांस्कृतिक अस्मिता अधोरेखित केली.
याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, राजेश जेठाणी, नगर परिषदेचे उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी आणि मंगेश गुरफुले यांनी उपस्थित राहून प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. या ऐतिहासिक मोर्चाचे नेतृत्व आणि समन्वयामध्ये भगीरथ बेचानकुवर (आदिवासी विदर्भ प्रांत हितरक्षा प्रमुख), पंढरी दर्रो (प्रांत खेलकूद प्रमुख), जास्वंदा दर्रो (आदिवासी पश्चिम क्षेत्र महिला प्रमुख), प्रा. देवराव गजभिये (वनवासी कल्याण आश्रम जिल्हा सचिव), आनंद चौबे व विनोद कोरेटी (सामाजिक कार्यकर्ते) यांचा समावेश आहे.
दिल्ली येथे होणाऱ्या या समागमाच्या माध्यमातून जनजाती समाजाची संस्कृती, हक्क आणि गौरवशाली परंपरांचे दर्शन संपूर्ण देशाला घडणार आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातून इतक्या मोठ्या संख्येने नागरिक दिल्लीला रवाना झाल्याने या आंदोलनाची आणि उत्सवाची व्याप्ती स्पष्ट होत आहे. निरोपाच्या वेळी संपूर्ण देसाईगंज स्थानक परिसर जनजाती संस्कृतीच्या जयघोषाने भारावून गेला होता.



