
जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने; आदिवासींचा ‘वनवासी‘ उल्लेख केल्याने गृहमंत्री अमित शाह यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी
गडचिरोली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने होणारी दरवाढ, त्यामुळे वाढलेली भीषण महागाई आणि आदिवासी बांधवांचा ‘वनवासी’ असा उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एक मोठे आणि अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या आक्रमक नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे, पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या हताश वाहनधारकांना काँग्रेसतर्फे चक्क ‘चॉकलेट’चे वाटप करण्यात आले आणि या चॉकलेटच्या गोडव्याने केंद्र सरकारची महागाई विसरण्याचा उपरोधिक सल्ला देण्यात आला.
“बहुत हो गई महंगाई की मार, हद्दपार करो मोदी सरकार”, अशा गगनभेदी घोषणा देत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना ॲड. विश्वजीत कोवासे यांनी केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. “इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा थेट फटका जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर झाला आहे. शेतीच्या मशागतीचा खर्च वाढल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. अनेक भागांत पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठ्याचा तुटवडा जाणवत असून सरकारने ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.
याच आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाने गेल्या आठवड्यात दिल्लीत आयोजित केलेल्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासींचा उल्लेख ‘वनवासी’ केल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. “आदिवासी हे या देशाचे मूळ रहिवासी (मूलनिवासी) आहेत, त्यांना ‘वनवासी’ म्हणून हिणवणे हा संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान आहे,” असा आरोप ॲड. कोवासे यांनी केला. या मुद्द्यावरून भारतीय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कुसुम अलाम यांनी आक्रमक पवित्रा घेत, “हा विषय थेट संयुक्त राष्ट्रसंघात (UN) नेणार असून अमित शाह यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी केली.
या व्यापक आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश महासचिव पंकज गुड्डेवार, नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक बंडू शनिवारे, नगरसेवक नंदू कायरकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावळ, सोशल मीडियाचे प्रदेश सचिव नंदू वाईलकर, जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, शिक्षक सेलचे दत्तात्रय खरवडे, माधुरी मडावी, विजय गोरडवार, संजय मेश्राम, सहकार सेलचे अब्दुल पंजवाणी, रवींद्र किरमिरवार, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, विवेक घोंगडे, अभिजित घाईत, महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, प्रभाकर वासेकर, जितू मुनघाटे, मीनल चिमूरकर, शितल ठवरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.



