
कर्टिन विद्यापीठात शिक्षणासाठी चौथ्या बॅचची निवड प्रक्रिया १३ जूनपासून; लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन उचलणार संपूर्ण शैक्षणिक खर्च
गडचिरोली: समृद्ध आदिवासी संस्कृती आणि जिद्दीच्या बळावर ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात एका मोठ्या शैक्षणिक क्रांतीचा उदय झाला आहे. एकेकाळी अशक्य वाटणारे परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न आज गडचिरोलीतील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी वास्तवात उतरले आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) आणि त्यांच्या ‘लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन’च्या पुढाकारामुळे जिल्ह्यातील २८ हुशार विद्यार्थी आज ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित कर्टिन विद्यापीठात आपले भविष्य घडवत आहेत.
या शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन हे आहेत. “प्रादेशिक विकासाची सुरुवात ही माणसांमधील गुंतवणुकीपासून होते,” या विचारावर ठाम राहत, त्यांनी गडचिरोलीतील गुणवंत मुला-मुलींना जागतिक दर्जाची संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला. हा उपक्रम केवळ आर्थिक मदत नसून, येथील तरुणांना भविष्यातील नेतृत्वकर्ता म्हणून घडवण्याचा एक मोठा प्रयत्न आहे.
लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनतर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाचा खर्च उचलला जात आहे. यामध्ये केवळ शिक्षण शुल्कच (Tuition Fees) नाही, तर राहणीमानाचा खर्च आणि प्रवासासह सर्व संबंधित खर्चाचा समावेश आहे. प्रत्येक विद्यार्थ्यावर दरवर्षी सुमारे ५० लाख रुपये खर्च केले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमासाठी प्रति विद्यार्थी अंदाजे १.५ ते २ कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक फाउंडेशनद्वारे केली जात आहे. या आर्थिक पाठबळामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही चिंतेशिवाय जागतिक दर्जाच्या पदव्या मिळवता येत आहेत.
गेल्या दोन वर्षांत तीन यशस्वी बॅचेस ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्यासाठी रवाना झाल्या असून, आता चौथ्या बॅचसाठी नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. चौथ्या बॅचसाठी अर्ज प्रक्रिया 13 जून ते 20 जून या कालावधीत सुरू राहणार आहे. पारदर्शक पद्धतीने गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
गडचिरोलीमधील हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या करिअरला जागतिक उंची मिळवून द्यावी, असे आवाहन लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे गडचिरोलीच्या विकासाला केवळ तांत्रिक नाही, तर मानवी दृष्टिकोनातून एक नवी दिशा मिळाली आहे.



