गडचिरोलीविदर्भ

गावपातळीवर दारू व तंबाखू मुक्तीसाठी पोलीस पाटलांनी पुढाकार घ्यावा

गडचिरोली : गावांमध्ये शांतता, सुव्यवस्था आणि निरोगी वातावरण टिकवून ठेवण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामीण भागातून दारू व तंबाखूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी पोलीस पाटलांनी सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन कोरचीचे पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी केले.

कोरची पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक ठाकरे सर यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील पोलीस पाटलांची  बैठक आयोजित करण्यात आली होती, याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीत मुक्तीपथ अभियान अंतर्गत दारू व तंबाखूमुक्त समाज निर्मिती, व्यसनमुक्ती जनजागृती आणि अवैध दारू विक्रीला प्रतिबंध घालण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मुक्तीपथचे तालुका संघटक धर्मेंद्र बोपचे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. दारू आणि तंबाखूच्या सेवनामुळे व्यक्तीचे शारीरिक व मानसिक नुकसान तर होतेच, सोबतीने कुटुंब आणि समाजावर त्याचे गंभीर आर्थिक व सामाजिक दुष्परिणाम होतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गावपातळीवर ही व्यसनमुक्तीची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी केवळ शासकीय स्तरावर प्रयत्न न करता ग्रामसभा, शाळा, युवक मंडळे, महिला बचत गट आणि ग्रामस्तरीय समित्यांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्याचे आवाहन बोपचे यांनी केले.

बैठकीदरम्यान गावांमध्ये चालणाऱ्या अवैध दारू विक्री, वाहतूक व साठवणुकीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती त्वरित पोलीस प्रशासनाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले. पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी स्पष्ट केले की, तालुक्यातील दारूविक्रीबंदी आणि व्यसनमुक्ती अभियानात कोरची पोलीस विभागाचे संपूर्ण सहकार्य लाभेल. अवैध व्यवसायांना पाठीशी घातले जाणार नाही. गावाला व्यसनमुक्त आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी गावातील मुख्य दुवा म्हणून काम करावे, असे त्यांनी नमूद केले.

या बैठकीला कोरची तालुक्यातील विविध गावांचे पोलीस पाटील उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी, उपस्थित सर्व पोलीस पाटलांनी आपापल्या गावात दारू व तंबाखूविरोधी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button