
बिस्किट आणि आईस्क्रीमचे आमिष दाखवून केले कृत्य ; मोठ्या बहिणीच्या सतर्कतेमुळे सुटका, आरोपीवर ‘पोक्सो‘ अंतर्गत गुन्हा दाखल
चंद्रपूर : शहरात माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली आहे. घरासमोर खेळत असलेल्या अवघ्या ५ वर्षांच्या निष्पाप चिमुकलीला बिस्किट आणि आईस्क्रीमचे आमिष दाखवून एका ६० वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने पावले उचलत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ओमकार उद्धवराव गेडाम (वय ६०) असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव असून, त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पीडित ५ वर्षांची चिमुकली तिच्या १२ वर्षांच्या मोठ्या बहिणीसोबत आणि परिसरातील इतर मुलांसोबत घरासमोर खेळत होती. याच दरम्यान, ६० वर्षीय आरोपी ओमकार गेडाम हा आपल्या पत्नीसह कारने त्याच मार्गावरून जात होता. काही वेळानंतर त्याने त्या चिमुकलीला आवाज देऊन बिस्किट देण्याच्या बहाण्याने आपल्याजवळ बोलावले. निष्पाप लहानगी त्याच्याकडे गेली, बिस्किट घेऊन परत आली आणि तिने ती बिस्किटे सोबत खेळणाऱ्या इतर बालकांनाही वाटली. त्यानंतर काही वेळाने नराधम आरोपीने पत्नीची नजर चुकवून पुन्हा त्या चिमुकलीला आवाज दिला. यावेळेस त्याने तिला आईस्क्रीम देण्याचे आमिष दाखवून बोलावले. निष्पाप मुलगी पुन्हा विश्वासाने त्याच्याकडे गेली असता, आरोपीने तिला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
बराच वेळ झाला तरी आपली लहान बहीण परत आली नाही, हे लक्षात येताच बाहेर खेळत असलेल्या १२ वर्षीय मोठ्या बहिणीला शंका आली. तिने परिसरात लहान बहिणीची शोधाशोध सुरू केली आणि तिला मोठ्याने आवाज देऊ लागली. मोठ्या बहिणीचा आवाज जवळ येत असल्याचे ऐकून घाबरलेल्या आरोपीने चिमुकलीला सोडून दिले आणि तिथून पळ काढला.
दोन्ही बहिणी घाबरलेल्या अवस्थेत घरी परतल्या. त्यानंतर पीडित चिमुकलीने घडलेला सर्व भयानक प्रकार आपल्या आईला सांगितला. चिमुकलीची ही हृदयद्रावक आपबीती ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी क्षणभरही वेळ न गमावता थेट पोलीस ठाणे गाठून नराधम वृद्धाविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ आरोपी ओमकार गेडाम याला अटक केली आहे. या संतापजनक प्रकरणाचा पुढील सखोल तपास ठाणेदार सुधाकर कोकाडे करत आहेत.



