
आयटकच्या नेतृत्वाखाली आंदोलन ; लेखी आदेशानंतर आंदोलन मागे
चामोर्शी : कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र आरोग्य सेवा बजावणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तब्बल ३१ महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता थकीत असल्याच्या निषेधार्थ आणि चुकीच्या धोरणामुळे बंद झालेली राशन कार्ड पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी चामोर्शी येथे सोमवारी (दि.६) तीव्र आंदोलन छेडण्यात आले. आयटक (AITUC) संघटनेच्या नेतृत्वाखाली आशा व गटप्रवर्तकांनी पंचायत समिती, तहसील आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. प्रशासनाने मागण्यांबाबत लेखी आदेश जारी केल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.
शासकीय आदेश असूनही ग्रामपंचायत व नगरपंचायत स्तरावरून आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांना दरमहा १ हजार रुपयांप्रमाणे ३१ महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नाही. या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या आशा सेविकांनी ‘ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती’च्या सचिव पदाचा सामूहिक राजीनामा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला व तो तातडीने मंजूर करण्याची मागणी केली.

आंदोलक महिलांनी तहसील प्रशासनाच्या एका अजब कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. चामोर्शी तहसील कार्यालयाने अनेक गरीब, गरजू, विधवा आणि परितक्त्या आशा स्वयंसेविकांना चक्क ‘सरकारी कर्मचारी’ गृहीत धरून त्यांची अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाची राशन कार्ड बंद केली आहेत. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असून, ही राशन कार्ड तात्काळ पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच, निवडणुकीशी संबंधित बी.एल.ओ. (BLO) आणि एस.आय.आर. (SIR) ची सक्तीची कामे आशा सेविकांवर लादू नयेत, अशीही मागणी लावून धरण्यात आली.
आयटकचे राज्य सचिव कॉ. विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान शिष्टमंडळाने गट विकास अधिकारी मा. प्रकाश पोळ, तहसीलदार मा. प्रशांत घोरुडे, अन्न पुरवठा अधिकारी प्रशांत अंबादे आणि तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र पेद्दाला यांना मागण्यांचे निवेदन दिले.
मोर्च्याची दखल घेत गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी तत्काळ लेखी आदेश काढून ग्रामपंचायत स्तरावरून थकीत कोरोना भत्ता अदा करण्याचे निर्देश जारी केले. दुसरीकडे, तहसीलदार व अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी तांत्रिक त्रुटी दूर करून बंद झालेली राशन कार्ड पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाकडून सकारात्मक लेखी पाऊल उचलण्यात आल्याने अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी आयटकचे अध्यक्ष कॉ. विनोद झोडगे पाटील, जिल्हा सचिव कॉ. सरिता नैताम, तालुका सचिव किरण गांधारे, गोपिका धूर्वे, निर्मला सोनटक्के, सोनिया चांदेकर, संगीता गुरनुले, पुष्पा बोटावार यांच्यासह चामोर्शी तालुक्यातील शेकडो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



