
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीचे आधुनिकीकरण करून तेथील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. ऊर्जानगरच्या सर्वांगीण विकासासाठी एक सर्वंकष विकास आराखडा तयार करावा आणि त्यास तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आ. मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या विकास आराखड्यात ऊर्जानगर वसाहतीचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी रस्त्यांचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण. नवीन शासकीय निवासस्थानांची निर्मिती. हरित क्षेत्रांचा (Green Zones) विकास व क्रीडा सुविधा. आरोग्य सुविधा आणि आधुनिक बाजारहाट संकुल. महिला बचत गटांसाठी विशेष ‘उद्योग भवन’ या कामांचा समावेश आहे.
मुंबई येथे झालेल्या या भेटीदरम्यान आ. मुनगंटीवार यांनी वसाहतीतील नागरी सुविधांच्या स्थितीवर सविस्तर चर्चा केली. या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. या सकारात्मक प्रतिसादामुळे ऊर्जानगरच्या विकासकामांना लवकरच गती मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
चंद्रपूरच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी आ. सुधीर मुनगंटीवार सातत्याने सक्रिय आहेत. त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडली असून, आता ऊर्जानगर वसाहतीच्या विकासामुळे येथील नागरिकांना अधिक सुखकर आणि सोयीसुविधांनी युक्त वातावरण मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी आराखड्यामुळे ऊर्जानगरचा परिसर आधुनिकतेच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



