अमेरिकेच्या हम्फ्रे फेलोशिपसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड

नागपूर : अमेरिका येथील हार्वर्ड कॅनडी स्कूलतर्फे आयोजित केलेल्या डिस्टिंग्विश्ड हम्फ्रे फेलोशिप प्रोग्राम ‘लिडरशिप फॉर २१-सेंचुरी’ कार्यक्रमासाठी या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड झाली आहे. या फेलोशिपसाठी भारतातून त्या एकमेव अधिकारी आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अमेरिकेतील फेलोशिपच्या कार्यकाळात विभागीय आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
वॉशिंग्टन, डी.सी. येथे सरकारमधील किंवा सरकारबाहेरील वरिष्ठ व्यावसायिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या तीन आठवड्यांच्या फेलोशिप प्रोग्राममध्ये, गंभीर समस्या असलेल्या क्षेत्रांमध्ये धोरण-स्तरीय जबाबदाऱ्या, नेतृत्व विकास सुलभ करणे, योग्य धोरणे आणि कार्यक्रम विकसित करण्याची क्षमता मजबूत करणे आणि इतर प्रमुख मुद्द्यांवर बहुपक्षीय सहयोग आणि सहकार्यास प्रोत्साहन देणे हा या फेलोशिपचा मुख्य उद्देश आहे. या फेलोशिपसाठी जगातील १२ देशांतील प्रतिष्ठित १२ व्यक्तींची निवड झाली असून यामध्ये भारतातून बिदरी यांचा समावेश आहे.



