
चंद्रपूर : मुल तालुक्यातील केळझर येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची सकाळी ८.०० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. सदर घटना वनपरिक्षेत्र चिचपल्ली अंतर्गत उपवनपरिक्षेत्र केळझर वनक्षेत्र कक्ष क्रमांक ४३९ मध्ये घडली.
प्राप्त माहितीनुसार, मुल तालुक्यातील येणाऱ्या केळझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे (वय ५८) हे नेहमी प्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगलात गुरे घेऊन गेले असता ते घरी परतले नाही. घरच्यांनी चिंता करीत वनविभागात याबाबत सूचना दिली. दरम्यान वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक तथा वनविभागाचे कर्मचाऱ्यांच्या चमूने जंगल शोध मोहीम सुरू केली. काल काहीच थांग पता लागला नव्हता म्हणून सकाळी पुन्हा वनविभागाची चमू काही नातलागासह जंगलात शोध घेतला असता ४ ते ५ कि.मी. अंतरावर गुराखी गणपत लक्षण मराठे यांचे प्रेत आढळून आले. तेव्हा त्यांना वाघाने ठार केल्याचे निदर्शनास आले. सदर सूचना घरच्यांना देत प्रेत उत्तरीय तपासणीसाठी मुल शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.



