
आष्टी-इलूर मतदारसंघात भाजपचा विस्तार
गडचिरोली : देशाचे लोकप्रिय नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून माजी जिल्हा परिषद सदस्या तथा माजी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रूपाली पंदीलवार यांचे पती संजय पंदीलवार यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.
माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. चामोर्शी तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार पाडत संजय पंदीलवार यांनी भाजपचा दुपट्टा स्वीकारला. त्यांच्यासह शशांक वैद्य, डॉ. साद्दमवार, गौरव वाट, आयुष पंदीलवार, समीर कारकुटवार, दिलीप प्यारमवार, प्रवीण सुर्तीकार, समीर आचेवार, विश्वनाथ कारकुटवार, मधुकर पुज्जलवार, प्रभाकर तिरपतवार, गणेश बत्तीवार, गंगाधर आलाम, प्रभाकर बावणे, रमेश चुनारकर, आनंद मेश्राम, प्रफुल पंदीलवार, दीपक पंदीलवार, आनंद वर्धेलवार यांनी भाजपात प्रवेश केला. यासोबतच गडचिरोली शहरातील प्रसिद्ध कंत्राटदार राजू भुसारी यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून पक्षशक्तीला बळ दिले.
यावेळी बोलताना माजी खासदार डॉ. अशोक नेते म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून, तो राष्ट्रनिर्मितीचे आंदोलन आहे. पंतप्रधान मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आज भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे.” नव्या कार्यकर्त्यांचा हा ऊर्जावान प्रवेश भाजप परिवारात नवचैतन्य निर्माण करणारा ठरला असून, “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राखाली जनसेवेचे अभियान नव्या उमेदीनं पुढे सरकत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, कि.मो.प्र. सचिव रमेश भुरसे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.



