गोंदियाविदर्भ

पोलीस दलासाठी ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यावर विशेष कार्यशाळा ; आरोपींच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यावर भर!

नागरी हक्क संरक्षण पथकातर्फे ८५ पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन; कायदेशीर त्रुटी दूर करून गुणवत्तापूर्ण तपासाचे धडे

गोंदिया : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच दाखल गुन्ह्यांचा तपास अधिक गुणवत्तापूर्ण होऊन न्यायालयात आरोपींच्या दोषसिद्धीचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलीस दलाची एक दिवसीय विशेष कार्यशाळा सोमवारी (२५ मे) जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडली.

अपर पोलीस महासंचालक (नागरी हक्क संरक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘नागरी हक्क संरक्षण, नागपूर परिक्षेत्र’ अंतर्गत गोंदिया येथील नागरी हक्क संरक्षण पथकाच्या वतीने या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, देवरीचे एसडीपीओ विवेक पाटील, तिरोड्याचे एसडीपीओ साहिल झरकर, गोंदियाच्या एसडीपीओ रोहिणी बानकर तसेच जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड. महेश चांदवानी प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यशाळेत उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना कायदेतज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले: ॲट्रॉसिटी कायद्याची विस्तृत माहिती: जिल्हा व विधी प्राधिकरण (गोंदिया) च्या पॅनल लॉयर ॲड. एकता गणवीर यांनी ‘ॲट्रॉसिटी कायदा १९८९ व सुधारणा अधिनियम २०१५’ मधील विविध कलमे आणि तरतुदींची सविस्तर माहिती दिली. महत्त्वाचे न्यायनिर्णय व दोषसिद्धी: सत्र व जिल्हा न्यायालय (गोंदिया) चे शासकीय अभियोक्ता ॲड. कृष्णा पारधी यांनी न्यायालयात खटला टिकवण्यासाठी तपासात कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, तसेच ताजे महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय (Judgments) लक्षात घेऊन आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण कसे वाढवता येईल, याचे कायदेशीर बारकावे समजावून सांगितले. गुन्हा नोंदणी ते तपासाचे टप्पे: आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांनी प्रत्यक्ष मैदानी स्तरावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यापासून ते चार्जशीट (दोषारोपपत्र) सादर करेपर्यंत करावयाच्या तांत्रिक व कायदेशीर तपास प्रक्रियेचे सविस्तर सादरीकरण केले.

या अभ्यासपूर्ण कार्यशाळेत गोंदिया जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि तपासी अंमलदार अशा एकूण ८५ पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग नोंदवून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक (तसेच नागपूर परिक्षेत्राचा अतिरिक्त कार्यभार असलेले) लक्ष्मीकांत पाटील यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वी करण्यात आली. यासाठी नागरी हक्क संरक्षण पथक (गोंदिया) चे सहाय्यक पोलीस निरीक्षक तीर्थदास निंबेकार, पोलीस अंमलदार उत्तम दहिवले, संतोष राऊत, सचिन गेडाम, सतिश हत्तीमारे, गौरव गिरी आणि संगीता शरणागत यांनी सक्रिय सहभाग नोंदवून अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक तीर्थदास निंबेकार यांनी उपस्थित सर्व मान्यवर व पोलीस दलाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button