गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

श्रमदानातून पांदण रस्त्याची डागडुजी

तुकूम वासियांचा पुढाकार

पालकमंत्री पांदण रस्ता योजनेचे भिजत घोंगडे!

गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पांदण रस्त्याचे माती काम करून लाखो रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतर पुढील काम झाले नसल्याने अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना पांदणरस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने पांदण रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी पालकमंत्री पांदण रस्ता योजना कार्यान्वित केली होती. मात्र, त्या योजनेतून कामच झाले नसल्याने जिल्ह्यातील अनेक पांदण रस्त्याची स्थिती अतिशय विकट झाली असून स्थानिकांना श्रमदानातून डागडुजी करावी लागत असल्याचे चित्र धानोरा तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे.

धानोरा तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या तुकूम येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून माती काम व पाईप टाकून रस्त्याचे काम करण्यात आले होते. हा रस्ता तुकुम-गोडेपार असा असून जवळपास अडीच किलोमीटरचा आहे. सदर रस्त्याचे काम १२ वर्षापूर्वी करण्यात आले. यात काही ठिकाणी पाईप टाकून माती काम, तर काही ठिकाणी बाजूला सुरक्षा भिंत तयार करून लहान पुलाची निर्मिती करण्यात आली होती, मात्र, दरवर्षी पावसात अनेक ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी पाईप जवळील मातीच पुराने वाहून गेल्याने रस्त्यावरून आवागमन करणाऱ्या शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा पांदण रस्त्याविषयी ग्रामसभेत दुरुस्तीसाठी मागणी करण्यात आली. यासोबतच कच्चा रस्त्याचे रूपांतर पक्क्या रस्त्यात करण्यासाठी नागरिकांनी आवाज उठवला. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, असल्याचे बोलल्या जात आहे. असे असले तरी राज्यात दरम्यानच्या काळात पालकमंत्री पांदण रस्ता योजना सुरू करण्यात आली होती. त्या योजनेतून सदर पांदण रस्त्याचे रूपांतर पक्क्या रस्त्यात करावे, अशीही मागणी होत आहे.

मात्र, याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांनीच श्रमदानातून पांदन रस्त्याची दुरुस्ती करावी लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासाठी या परिसरातील नागरिक योगेंद्र गोटा, अंकुश गोटा, साजू मडावी, अंतराम हलामी, काशीराम वडे, गोपाल करंगामी, रघुनाथ नैताम, ज्योतीराम होळी आदींनी श्रमदान करून रस्त्याचे काम केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button