
गडचिरोली : “प्रभू श्रीराम आणि मंदिरातील दानपेटी आज देशात असुरक्षित आहे, याचे सर्व श्रेय भाजपने घेतले पाहिजे,” अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी भाजपवर केली. शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात देशव्यापी ‘श्री राम रक्षा आंदोलन’ सुरू आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आणि विदर्भातून मोठा जनपाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे विदर्भ दौऱ्यावर असून गुरुवारी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित एका मोठ्या आंदोलनाची घोषणा केली. जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न आणि स्थानिक नागरिकांच्या हक्कांसाठी येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात शिवसेना युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत एक भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विशेषतः जिल्ह्यातील वन्यजीव आणि मानव-वन्यजीव संघर्ष या गंभीर विषयावर आदित्य ठाकरे स्वतः लक्ष घालून हा प्रश्न हाती घेणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना अंबादास दानवे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याला योग्य न्याय देत नाहीत. नैसर्गिक साधनसंपत्तीची कोणतीही कमतरता नसलेला हा जिल्हा म्हणजे ‘सोन्याची चिमणी’ आहे. मात्र, भाजपने केवळ सत्तेसाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी या जिल्ह्याचा वापर केला असून, येथे अजूनही खरा विकास पोहोचलेला नाही. आता गडचिरोलीतील जनतेने स्वतःहून पुढे येऊन या अन्यायाविरुद्ध बोलण्याची वेळ आली आहे.”
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे गडचिरोली विधानसभा संपर्क प्रमुख नंदू कुमरे, जिल्हाप्रमुख पवन गेडाम, माजी जिल्हा परिषद सदस्य वेणूताई ढवगावे यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



