
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
गडचिरोली : भारत-पाक सीमेवरील सध्याच्या युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संभाव्य धोके आणि करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत बोलताना गाडे यांनी जिल्ह्यातील सर्व विभागांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सज्ज राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाने तातडीने आराखडा तयार करावा, तसेच जिल्ह्यातील संवेदनशील प्रकल्पांची रंगीत तालीम (Mock Drill) घ्यावी, असे आदेश त्यांनी दिले. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व दवाखाने चोवीस तास सुरू ठेवण्याची आणि पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
यावेळी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आवाहन करण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अधिकृत माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा व्हॉट्सअॅप चॅनेल https://whatsapp.com/channel/0029VbAPkzTKGGG8KdTvgY41 फॉलो करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे:
- जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष: ०७१३२-२२२०३१, मोबाईल: ९४२३९११०७७
- पोलीस नियंत्रण कक्ष: ०७१३२-२२३१४२/२२३१४९, मोबाईल: ९४०३८०१३२२
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता सुमित मुंधडा, नगर परिषद गडचिरोलीचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, पोलीस निरीक्षक (DSB) निखिल फटींग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
एकंदरीत, भारत-पाक सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा प्रशासन सतर्क असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे.



