
जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
गोंदिया : सन २०२० मध्ये रावणवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाघोली (काटी) येथे एका युवतीची छेड काढणाऱ्या आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवून ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी हा निकाल दिला. सत्या ऊर्फ दीपक डहाट असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
१३ डिसेंबर २०२० रोजी दुपारी १:३० वाजता बाघोली (काटी) येथे पीडित युवती घरी एकटी असताना आरोपी दीपक डहाट तिच्या घरात घुसला आणि तिची छेड काढली. पीडितेने आरडाओरडा केल्यावर आरोपीने तिला ५०० रुपयांचे आमिष दाखवून घटनेबद्दल वाच्यता न करण्याची धमकी दिली.
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, १४ डिसेंबर २०२० रोजी रावणवाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ (अ) (ब), ४५० आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायाधीश एन. डी. खोसे यांनी साक्षीपुरावे, तांत्रिक बाजू आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून आरोपी दीपक डहाट याला दोषी ठरवले. २ मे २०२५ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने आरोपीला ५ वर्षांचा सश्रम कारावास आणि १ हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास आणखी ६ महिन्यांचा कारावास ठोठावला.
या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. खंडेलवाल यांनी युक्तिवाद केला, तर न्यायालयीन कामकाजात पोलीस हवालदार यादोराव कुर्ते यांनी सहकार्य केले.



